पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
हजारीबाग - दिल्लीतील 11 जणांच्या संशयित मृत्यूची घटना ताजी असतानाच आणखी एक हत्येचे प्रकरण झारखंडमध्ये समोर आले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे. ही घटना हजारीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुनागा बागान गार्डन परिसरात घडली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह त्यांच्यात राहत्या घरात आढळले. चार जणांचे मृतदेह घरात फासावर लटकलेले होते. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. तर एकाने छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत्यू झालेले सर्व एकाच कुटुंबातील असून आई-वडील, मुलगा व मुलगी, नातवंडे यांचा समावेश आहे. कुटुंबप्रमुख नरेश माहेश्वरी यांनी प्रथम त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि मुलाला फासावर लटकवले. त्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वत: घराच्या छतावरून उडी मारली असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला. तसेच नरेश हे कर्जबाजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.