अल्पवयीन मुलीचा विनयभंग! आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह, अॅट्रोसिटीचा गुन्हा
श्रीगोंदा / प्रतिनिधी
तालुक्यातील नवनाथ नगरमधील शिक्षण घेत असलेल्या, अल्पवयीन मुलींबरोबर येथील काही गावगुंडांनी श्रीगोंद्यात लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने पाठलाग करुन छेडाछडी करीत गळयात हात घालून तिला शिवीगाळ करीत दमबाजी केली आहे. या मुलीच्या फिर्यादीवरून या दोन इसमाविरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार तसेच पीडित मुलगी दलित प्रवर्गातून असल्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी येथील नवनाथ नगरमधील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला, श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीच्या पुलावर काल दि. 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अधोरेवाडी नवनाथनगर येथीलच दादा बिबे व गौरव (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांनी पीडितेचा पाठलाग करीत अश्लिल भाषा वापरत, गळ्यात हात टाकून लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची वर्तणूक केली व शिवीगाळ करून दमबाजी केली, यावर पीडित मुलीने मंगळवारी श्रीगोंदा पोलिसांत या दोघांविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून दादा बिबे व गौरव यांच्याविरोधात गु.र.नं. आय 328/2018 नुसार बाल अत्याचार सरंक्षण कायदा कलम 7 व 8 तशेच भा.दं.वि. कलम 354 (ड), 509, 504, 506 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1)(डब्लू)(आय) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुलेआम अशा पध्दतीने कुणाचीही तमा न बाळगता असे कृत्य करू पाहणार्या नराधमांना काही कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला दिसून येत नाही, शिवाय श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीमंत विजयराजे कन्या विद्यालय, महादजी शिंदे विद्यालय मुले, गुळवे विद्यालय, एस टी अधिकार्यांनी तसेच इतर विद्यालये व महाविद्यालयांच्या प्राध्यापक व पालकांनी वारंवार या घटना घडण्याचे संकेत स्थानिक पोलिस प्रशासनास दिले आहेत. मात्र पोलिस यंत्रणा मोठया विषयामध्येच गर्क आहेत. एखाद्याने विचारणा केलीच तरख पोलिसांकडे संख्याबळ नसल्याचे कारण सांगून, मोकळे झालेले अधिकारी काही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कमी नाहीत.
रोडरोमिओ आणि टवाळखोरांपासून वाचण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यापेक्षा पालकांनी सतर्क राहून, स्वतः आपल्या पाल्यांना शाळेत पोहचवणे व घेऊन जाणे आवश्यक बनले आहे. असे या घटनेतून निदर्शनांस येत आहे.
