विद्यूत मोटारींमधील तांब्याच्या तारांची चोरी
श्रीगोंदा / प्रतिनिधी
निमगाव शिवारात भीमा नदीवर शेतीच्या पाण्यासाठी बसवलेल्या, विद्यूत पंपाच्या आतील तांब्याच्या 12 पंपांच्या वायरी तोडून चोरून नेल्याने, शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, या चोरांचा बंदोबस्त करावा अशी तक्रार ज्ञानदेव विठ्ठल नलगे यांनी श्रीगोंदा पोलिसात दिली आहे.
आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, निमगाव शिवारात आमची शेत जमीन भीमा नदीपात्र लगत आहे. सदर जमिनीत नदीच्या कडेला आमच्या शेतीसाठी पाणी उपसा करणार्या माझ्यासह अनेकांच्या विद्यूत मोटारी आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे शेतीत फेरफटका मारण्यासाठी गेलो असता, माझ्या शेतीलगत सोनवडी बंधार्या लगतच्या सुमारे 10 एच पी, 15 एच पीच्या विद्यूत मोटारी पाईप बाजूला करून, मोटारी खोलून त्यातील तांब्याच्या धातूच्या किमती असणार्या वायरी कोणी तरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्या.
सदर ठिकाणी अनेक शेतकर्यांच्या शेकडो विद्यूत पंप आहेत. येथून अनेकदा अशा घटना घडल्या असून, अनेकवेळा केबल, आणि विविध पार्ट कायम स्वरूपी चोरीला जात आहेत. तर, विद्यूत पंप चोरांना पकडून त्यांचेवर कारवाई करावी अशी तक्रार नलगे यांनी दाखल केली आहे.
