धूमस्टाईलने विवाहितेचे दागिने लंपास
राहुरी प्रतिनिधी
लग्नसमारंभासाठी येथे अालेल्या संगमनेरच्या सीमा दिघे यांच्या गळ्यातील ११ तोळे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी धूमस्टाइलने पळविल्याची घटना दि. १० रोजी दुपारी घडली. याप्रकरणी सीमा दिघे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील तळेगांव येथील दिघे या पतीसोबत राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे विवाह सोहळ्यास आल्या होत्या. येथील राधाराम मंगल कार्यालयात दि. १० रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी दीडच्या सुमारास मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या पत्रा डेपोसमोर त्यांचे पती दुचाकी लावत असतांना सिमा दिघे या तिथे उभ्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधून काळ्या रंगाच्या दुचाकीवर तेथे आले. त्यांनी अचानक सीमा दिघे यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे गंठण, चार तोळे वजनाचा राणीहार आणि दोन तोळे वजनाचे मिनी गंठण असा एकूण २ लाख रुपये किंमतीचे ११ तोळे सोने अोरबडून घटनास्थळावरुन धूम ठोकली. सीमा दिघे यांनी आरडाओरड केली. मात्र कोणाला काही कळण्याच्या आत ते भामटे शिर्डीच्या दिशेने पसार झाले. दिघे यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन राहुरी पोलिस ठाणे गाठले. दोन अनोळखी इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ हे करीत आहेत.
