Breaking News

तालुक्याच्या सहकारात विष कालवणा-यांना जनताच थारा देत नाही - आ.बाळासाहेब थोरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला कुणाची नाव ठेवण्याची हिंमत नाही. आज सर्व राज्यभर येथील कामाचे कौतुकच होते. मात्र काही मंडळी व्देष मनात ठेवून तालुक्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वेळीच जाब विचारा, तालुक्याच्या विकासात व सहकारात विष कालवणार्‍यांना येथील जनता कधीच थारा देत नाही असे रोख ठोक प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेडगांव येथे आयोजित भव्य ऊस विकास मेळावा प्रसंगी ते बोलत होते. आ. थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखानाच्या पारदर्शक कारभाराचे राज्यात कौतुक होते. कुणीही बोट करत नाही. मात्र यांचा जनतेचा संबंध नाही ते खोटे नाटे बोलून जनतेत विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारखाना हा तालुक्याच्या विकासाचे हृदय आहे. ते मोडकळीस आले तर यांना तुलना करायला कुणीच राहणार नाही. म्हणून आपला कारखाना मोडण्याचा त्यांचा डाव आहे. पण येथील जनता ते कधीच होवू देणार नाही. कारखाना व सहकार आपला प्रपंचाशी व भाकरीशी निगडीत आहे. कोणी ही येतो आणि मेळावे घेतो अशा विष कालवणा-या विघ्नसंतोषी लोकांना वेळीच रोखा. तालुक्याच्या विकासाच्या उभारणीत मागील पिढीतील कार्यकत्यांचे मोठे योगदान राहीले आहे. सहकार महर्षी दादांचा विचार घेवून येथील कारभार आदर्शवत चालू आहे. पुढील ५० वर्षांचे नियोजन करुन ५५०० मे. टन क्षमतेचा कारखाना व ३० मे. वॅट वीजनिर्मीती प्रकल्प कमी खर्चात कमी कालावधीत सुरु झाला आहे. मनशुध्द हेतू चांगला असल्यामुळे परमेश्वराचे कायम आपल्याला आशिर्वाद मिळतात. कारखान्याच्या कामात आपण कधी ही राजकारण आणत नाही. कधी ही भेदभाव करत नाही. सर्व ऊस उत्पादकांना २३०० रुपये भाव प्रमाणे वेळेत पैसे दिले. कामगारांचे पेमेंट वेळेत दिले जाते. इतर कारखान्यांनी दिले का ? इतर कारखान्यांनी कामगारांचे पेमेंट दिले का हे तपासून पहा, अशा अपप्रवृत्तींना वेळीच रोखा असे आवाहन करतांना कमी श्रमात जादा उत्पादन करतांना ठिंबक सिंचनाचाच वापर करावा व कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख मे. टन ऊस उत्पादन करावे असे आवाहन त्यांनी केले.