मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा; अन्यथा आमरण उपोषण
राहुरी प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगांव फुणगी येथे बांध नांगरल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या घटनेला आठवडा उलटूनही आरोपी मोकाट आहेत. पोलिसांची काहीच कारवाई नसल्याने पिडितांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मागील आठवड्यात दि. ३ जुलै रोजी सकाळी ६ च्या दरम्यान बाजीराव वडितके [रा. पिंपळगांव फुणगी] हे त्यांच्या शेतात गेले होते. त्याचवेळी भाऊसाहेब वडितके हा त्यांची शेती नांगरत होता. यावेळी त्याने तेथील सामाईक बांध नांगरण्यास सुरुवात केली. बाजीराव वडितके यांनी बांध का नांगरतो, असे विचारले. मात्र याचा राग आल्याने त्याने बाजीरावने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या भांडणाचा आवाज ऐकून नितीन भाऊसाहेब वडितके व सचिन भाऊसाहेब वडितके हे हातात कोयते घेऊन धावत आले. त्यावेळी नितीन वडितके याने बाजीराव यांच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. बाजीराव यांनी आरडाओरड केली असता त्यांची पत्नी व भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यांच्याही डोक्यात सचिन वडितके याने कोयता मारुन गंभीर जखमी केले. सदर भांडणे पाहून भाऊसाहेब कारभारी वडितके यांचे सर्व जवळचे भाऊबंद धावत आले. त्यांनी बाजीराव वडितके व त्यांची पत्नी, भाऊ यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत बाजीराव वडितके यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात कारभारी वडितके, भाऊसाहेब वडितके, बाळू वडितके, एकनाथ वडितके, रंगनाथ वडितके, सचिन वडितके, नितिन वडितके, अच्युत वडितके, अरुण वडितके, चंद्रकांत वडितके, सुदाम वडितके, गजा वडितके, दिमाका वडितके, स्वाती वडितके, सोनाली वडितके, लता वडितके, सुमन वडितके या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटून गेला. तरीही या आरोपींवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना गुन्हा मागे घ्या. नाहीतर मारुन टाकू, अशा आरोपी धमक्या देत आहेत, असे पिडितांनी सांगितले. त्यामुळे सदर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगण्यात आले.
