मुंबईत उद्या (बुधवारी) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यामुळे पुण्याहुन मुंबईला जाणारी सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या केवळ डेक्कन क्विन ही सुरु राहणार असून प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेस गाड्याच्या प्रवाशांचा ताण डेक्कन क्विनवर येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय मात्र होणार आहे. मुंबई आणि परिसरात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 6.5 वाजता सुटणारी सिंहगड एक्स्प्रेस तसेच 7.50 वाजता सुटणारी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तर सकाळी 7.15 वाजता सुटणारी डेक्कन क्विन नियोजित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या गाड्या मुंबईकडूनही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.