नागपुरात एका महिलेला ब्राऊन शुगरची तस्करी करताना अटक करण्यात आली. चित्रा मनोज रहांगडाले (वय. 30 रा. इतवारी रेल्वे स्थानक) असे या महिलेचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या महिलेकडून ब्राऊन शुगर, मोबाईल, दुचाकी असा 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार तुलसीदास शुक्ला यांना, 2 जुलै रोजी एक महिला ब्राऊन शुगर घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आवश्यक असलेले पंच व महिला कर्मचारी घेऊन घटनास्थळी सापळा रचला. निर्धारित वेळेत एक महिला दुचाकीवरून आली असता तिची तात्काळ झडती घेण्यात आली. तिच्याजवळ 659 ग्रॅम ब्राऊन शुगर, एक होन्डा एव्हिएटर दुचाकी, एक मोबाईल आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. चित्रा रहांगडाले हिच्यावर पाचपावली ठाण्यात अंमली पदार्थ कायदा कलम 21-क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन, पोलीस उप निरीक्षक स्वप्नील वाघ आदींनी केली.