Breaking News

सोयाबीन बियाणात कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची फसवणूक


कोपरगाव / ता.प्रतिनिधी 
’सिद्दी’ या कंपनीचे सोयाबीनचे बियाणे पेरुन दहा दिवस उलटले तरीही, उगवण झाली नसल्याने शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करुन, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. 
कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर, बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव आदी गावांतून सुमारे शंभर एकर क्षेत्रात सिद्दी या कंपनीचे सोयाबिनच्या बियाणाची पेरणी झालेली आहे. मात्र दहा दिवस होवूनही उगवण झाली नाही. या भागातील शेतकर्‍यांनी सौरभ कृषी सेवा केंद्र, धोंडेवाडी व ओम साई अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, रांजणगाव देशमुख ता. कोपरगाव या दुकानांतून वरील कंपनीचे बियाणे विकत घेतलेले आहे. त्यांना दिलेल्या बिलांवर लॉट नं. व अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. तसेच वरील कंपनीच्या बियाणांचे दर दोन्ही दुकानांत वेगवेगळे आहेत. या सर्व बाबीची तपासणी करून, तसेच प्रत्यक्ष प्लॉटचा पंचनामा करून सदर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनावर बहादराबादचे सरपंच कैलास रहाणे, उत्तम चरमळ, सोमनाथ गव्हाणे, नवनाथ गव्हाणे, रामनाथ गव्हाणे, अण्णासाहेब गव्हाणे, अंजनापूरचे सरपंच प्रकाश गव्हाणे, सीताराम गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, प्रदीप चांदर आदींच्या सह्या आहेत.

कृषी अधिकार्‍यांनी ’सिद्दी’ कंपनीच्या बियाणांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. या शेतकर्‍यांचा मशागतीपासून पेरणीपर्यंत झालेला खर्च संबंधित कंपनीने दिला पाहिजे. तसेच संबंधित कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली पाहिजे. यावरून कृषी अधिकार्‍यांचे कृषी सेवा केंद्रांवर लक्ष नाही असे दिसते.
- सुनील देवकर (मा. सभापती पं. समिती, कोपरगाव)