Breaking News

ग्रामपंचायतींनी दर्जेदार विकासकामे करावी : नागवडे


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
विकासकामे व कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे सर्वाधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत. हा निधी आता थेट ग्रामपंचायतीला मिळतो आहे. त्यामुळे आता कामांच्या दर्जात तडजोड न करता, ग्रामपंचायतींनी दर्जेदार विकासकामे करावीत. विकासकामांमध्ये खोडा न घालता ग्रामस्थांनी जागरुक राहून विकासकामे करणार्‍यांना पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन ’नागवडे’ कारखाण्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोग निधीतुन ’नागवडे’ कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत व रस्त्याच्या क्राँकीटीकरण कामाचा शुभारंभ नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नागवडे म्हणाले की, गावच्या विकासाचा निधी आता थेट गावांना मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामसभांचे महत्व वाढले आहे.पण दुर्दैवाने विकासकामांत राजकारण आणले जाते. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून चांगल्या कामांना विरोध होतो. त्यामुळे विकास प्रक्रियेत योगदान देण्याऐवजी अडथळे आणणार्‍यांचे महत्व वाढले आहे. अशा प्रवृत्तींना आता ग्रामस्थांनीच उत्तर देण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निधीतून करावयाची कामे दर्जेदार होण्यासाठी पदाधिकार्‍यांनी सतर्क रहावे असे आवाहन करुन ते म्हणाले की, लिंपणगाव ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथील कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु. ग्रामपंचायतीच्या विकासकामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. वृक्षारोपण ही आता काळाची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करुन आपली जबाबदारी संपत नाही तर, वृक्षसंवर्धन होईल याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नवनिर्वाचित सरपंच माधुरी साळवे यांनी ’नागवडे’ कारखाना व परिसरातील नागरिकांसाठी जवळपास पाऊण कोटी रुपये खर्चाच्या नविन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला मंजूरी मिळाली असल्याचे सांगून, हे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी ’नागवडे’ कारखाण्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर, संचालक अरुण पाचपुते, सुभाष शिंदे, अ‍ॅड. अशोक रोडे, विलास काकडे, प्रा. सुनिल माने, राकेश पाचपुते, विजय कापसे, विश्‍वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाटगे, उपसरपंच मिलींद भोयटे, मा. उपसरपंच बाळासाहेब जंगले, माजी सरपंच अ‍ॅड. सुनिल जंगले, दूध संघाचे संचालक विठ्ठल जंगले, प्रेमराज धस, दिलीप लोणकर, ग्रा.पं. सदस्य रविंद्र उजागरे, बाळासाहेब कांबळे, अमोल साळवे, बापूराव कुरुमकर, चंद्रकांत कुरुमकर, ग्रामविकास अधिकारी गुरव यांचेसह शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.