भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाचे कमबॅक
राजुर / प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा दमदार पावसाने कमबॅक केले असुन, आदिवासी शेतकरी बांधवांच्या पावसाअभावी रखडलेल्या भात लागवडीला पुन्हा एकदा जोमाने सुरुवात झाली. दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे, भंडारदरा धरणामध्ये झपाट्याने पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.
एका बाजुला मुंबईत पावसाचा हाहाकार उडविला असताना, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे आदिवासी बांधव भात लावणी करावी किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत होते. तर काही भागात दुबार पेरणीचे संकट देखील उभे राहिले होते. मात्र दोन दिवसापासुन पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने, आदिवासी शेतकरी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन, परिसरात आदिवासी बांधवांची शेतीच्या कामांसाठी लगबग चालु असल्याचे पाहावयास मिळत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे गत 24 तासात भंडारदरा 61 मी.मी, घाटघर 97 मी.मी, वाकी 16 मी.मी, पांजरे 32 मी.मी तर रतनवाडीत 140 मी.मी पावसाची नोंद झाली असुन, 12 तासात भंडारदरा पाणी साठ्यात 140 दलघफू नविन पाण्याची आवक झाली असुन, भंडारदरा धरणाचा साठा सायकांळी सहा वाजता 4788 दलघफू तर, निळवंडे धरणाचा पाणीसाठा 861 दलघफू इतका झाला. वाकी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन, प्रवरेची उपनदी कृष्णांवती नदीमध्ये 336 क्युसेसने ओव्हरफ्लो सुरु आहे. तर भंडारदरा व निळवंडे या दोन्हीही धरणांतुन पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असल्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे तर, वातावरणात प्रंचड गारवा निर्माण झाल्याने आदिवासींच्या धुण्यादेखील पेटत्या झाल्या आहेत.
