Breaking News

धुळे मारहाणप्रकरणी 23 जणांना अटक मृतांच्या कुटूंबियांना 5 लाखाची सरकारकडून मदत

धुळे : जिल्ह्यातील राईनपाडा येथे मारहाणीत झालेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी 23 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीपासुन पोलिसांनी तपासाला वेग देत पाच पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी पाठवले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आणखी संशयिताना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, मृतांच्या कुंटूंबियाना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहिर केली आहे. तसेच संशयितांना कठोर शासन करण्याचे आश्‍वासन दिल्याने मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे देखील आवाहन केले आहे. 

दरम्यान, मृतकांच्या परिवाराला 25 लाखांच्या शासकीय मदतीसह सरकारी नोकरी देवून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातवाईकांनी के ली आहे. मंगळवेढा तालु्क्यातून पोट भरायला आलेल्या भोसले परिवारातील पाच सदस्यांना दुर्दैवी मृत्यूचा सामना करावा लागला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटूंब राहत होते. मात्र मुले पळवणारी टोळी असल्याच्या अफवेतून भोसले कुटूंबातील 5 सदस्यांना जमावाने मारहाण केली. त्यात पाचही जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आदिवासी भागात पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, पालकांनी आपली मुले आश्रमशाळेतुन घरी न्यायला सुरूवात केली आहे. साक्री तालुक्यात अनेक पालकांनी आपली मुले भीतीपोटी घरी नेली आहेत. कुणाला या घटनेनंतर मुलांवर हल्ला होण्याची भीती आहे तर कुणाला मुले पळवून नेले जातील अशी भीती आहे. 

हत्येचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाया घटनेच्या निषेधार्थ राज्यात अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील सोलापूर, सांगोला, सातारा, यवत, पाटस यासह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात दोषींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.