Breaking News

साईचरणी भक्तांकडून एका वर्षांत 140 कोटींची भर संस्थानच्या गंगाजळीचा आकडा 2 हजार कोटींच्या वर

अहमदनगर : शिर्डीतील साईचरणी होणार्‍या भाविकांमध्ये ज्याप्रमाणे वाढ होत आहे, त्याचप्रमाणे साईच्या झोळीत दान देणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या वर्षांत साईचरणी तब्बल 140 कोटी रूपयांचे दान प्राप्त झाले. साई संस्थानच्या गंगाजळीचा आकडा वाढत चालला असून, तो आता जवळपास 2 हजार कोटींच्यावर जाऊन पोहचला आहे. (2017-18) या आर्थिक वर्षामध्ये साई संस्थानला तब्बल 140 कोटी रुपयांचे अधिकचे दान प्राप्त झाले आहे.

देशात सर्वाधीक श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपतीची गणना केली जाते. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थान गेल्या काही वर्षापासून गणले जावू लागले आहे. गेल्या वर्षी नोटबंदी नंतरही दानाच्या आकड्यात घट आली नव्हती. साई संस्थानला वस्तुपासून ते सोने चांदीचे ही दान साईभक्त करतात. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल 350 कोटी रुपयांचे दान दिले होते. त्याच्या मागच्या वर्षीचा आकडा हा 210 कोटी होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात भक्तांनी साईंच्या तिजोरीत 140 कोटीहुन अधिकची भर टाकल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
सन 2017 - 18 हे वर्ष साईबाबांचे समाधी वर्ष म्हणुन साजर केल जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच साईभक्तांनी दानाची रिघ लावल्याचे दिसून आले आहे. या वर्षी साईबाबा संस्थानचा आर्थिक लेखाजोखा हा तब्बल 580 कोटी रुपयांचा झाला असून त्यातीली 280 कोटींच्या वर साई संस्थानचा खर्च झाला आहे. साई संस्थाने विविध बँका आणि रोख्यांमध्ये आतापर्यंत 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर साई संस्थानकडे आजमितीस 470 किलो सोने आणि 6 हजार 500 कि लो चांदी जमा आहे. याशिवाय संस्थानाकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता ही मोठी असल्याची माहिती साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्यकार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.