Breaking News

ज्येष्ठ पत्रकार कुंदन गोटे यांचे निधन

मुंबई : दैनिक बहुजनरत्न लोकनायकचे संपादक व निर्भीड झुंजार पत्रकार कुंदन गोटे यांचे रविवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंब्रा येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन समाजात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत कुंदन गोटे यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी माजी नगरसेविका सिंधुताई गोटे, दोन मुले, दोन भाऊ चंदन व मदन तसेच आई व वडील असा परिवार आहे. संपादक कुंदन गोटे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आदरांजली वाहिली आहे. 
दैनिक लोकनायकचे संपादक कुंदन गोटे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री त्यांच्या राहत्या घरी रात्री उशीरा सीमा बिल्डिंग, शंकर मंदिर जवळ, संजय नगरच्या पुढे, मुंब्रा, जिल्हा ठाणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सोमवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी अंतरावली दायी, तालुका. घनसावंगी, जिल्हा. जालना येथे त्याच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक लोकनायकचे मुख्य संपादक म्हणून कुंदन गोटे यांनी आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान दिले. लोकनायक हे दैनिक नव्हे तर भीमसैनिक असल्याचे घोषणा करून वेळोवेळी प्रखर आंबेडकरी बाण्याची भूमिका दैनिक लोकनायकचे संपादक म्हणून कुंदन गोटे यांनी घेतली. धम्मसेवेसाठी ते सदैव तत्पर असत. त्यासाठी त्यांनी धम्म शासन नावाचे दैनिक सुद्धा सुरू केले होते. पत्रकार संपादक म्हणून काम करतानाच त्यांनी नेहमी समाजसेवेत पुढाकार घेतला. सर्वांना मदत करण्याचा सदैव हसमुख असणारे कुंदन गोटे हे अजातशत्रू होते. सर्वांशी मनमिळावू दिलदारवृत्तीचे कुंदन गोटे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच दुःखाचा धक्का बसला आहे. जेंव्हा राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती युती करावी की करू नये याबाबत चर्चा सुरू झाली, तेंव्हा सर्वप्रथम दैनिक लोकनायकचे संपादक म्हणून कुंदन गोटे यांनी खंबीरपणे भूमिका घेऊन शिवशक्ती- भीमशक्ती युती झाली पाहिजे या विचाराची ताकद माझ्या पाठीशी उभी केली. राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती महायुती यशस्वी होण्यात त्यांचे मोठे योगदान होते. संपादक कुंदन गोटे यांच्या निधनामुळे आपणास व सर्व समाजास दुःखाचा तीव्र आघात झाल्याचे सांगत नामदार रामदास आठवले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.