मिरजगाव कांदा मार्केटला तीनशे ते तेराशे रुपये लिलाव
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरजगाव उप बाजारात नुकतेच कांदा मार्केट सुरु झाले असुन, कांद्याला तीनशे ते तेराशे रुपये असा भाव मिळाल्याने शेतकर्यांमध्ये काहिसा आधार वाटत आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीने कात टाकली असुन मिरजगाव बाजाराचे पहिले वैभव परत आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. बंद झालेला बैल बाजार पुुन्हा सुरु केला असुन, लिंबु मार्केटदेखील सुरु करणार असल्याची माहिती सभापती श्रीधर पवार यांनी दिली. शुक्रवारी सत्तावीसशे कांदा गोण्यांची आवक झाली. झालेल्या लिलावात उत्तम प्रतीच्या कांद्यास तेराशे रुपये भाव मिळाला. मिरजगाव बाजारात चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यापार्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून शेतकर्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे, सहसचिव विकास तनपुरे यांनी सांगितले. झालेल्या लिलावाच्या वेळी सभापती श्रीधर पवार, संचालक महेश काळे, राजमल भंडारी, रावसाहेब कदम आदी उपस्थित होते. शेतकर्यांनी बाजारात माल आणताना प्रतवारी करुन आणावा असे अवाहन सभापती पवार यांनी यावेळी केले.