Breaking News

शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची मुसंडी

जामखेड / श. प्रतिनिधी ।

शहरासह तालुक्यात काही गावं वगळता मध्यरात्री दोन वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काही शेतकर्‍यांचे आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काहींच्या घरांची पडझड होवून काही घरांचे तर छत, पत्रेच उडून गेले. मात्र पावसामुळे झालेल्या नुकसानीची तहसील कार्यालयाकडे कसलीही नोंद झाली नव्हती. या वर्षी प्रथम जामखेड तालुक्यात वरूनराजाचे आगमन झाल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. शेतकर्‍यांना शेतीची कामे करण्यास दिलासा मिळाला आहे. या वर्षी जामखेड तालुक्यात पाणी फाऊंडेशनचे काम काही गावांत चांगल्या प्रकारे झाले आहे, यावर्षी पहिल्याच पावसाने पाटबंधारे व ठिकाणी ठिकाणी डबके भरल्याचे दिसून येते आहे.त्यामुळे जामखेड शहरासह तालुक्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन वातावरणात गारवा निर्माण होत आहे. मात्र एवढया मोठया पावसानंतरही सकाळपासूनच असह्य उकाडा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले. त्यातच जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.