Breaking News

जामखेडला मालट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार. नऊ जण जखमी, पहाटे चार वाजता झाला अपघात

जामखेड शहरापासून चार कि.मी अंतरावर खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथे मालट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणार्‍या लग्झरी बसचा काल पहाटे 4 वाजता भिषण अपघात झाला असून, अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू होवून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जामखेडसह परिसरात रात्री दोन वाजेपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने विज गेल्याने सर्वत्र अंधार काळोख पसरला होता. अशावेळी पहाटे चार वाजता शिऊर फाट्यावर मालट्रक आणि लग्झरीचा भीषण अपघात झाल्याची माहिती निनावी फोनद्वारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना समजली, भर पावसात कोठारी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी तातडीने दाखल झाले, त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त लग्झरीतून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. 
सविस्तर माहिती अशी की, हैद्राबादहुन शिर्डीकडे जाणारी एसव्हीआर लक्झरी बस क्र.- एपी 35 यू 5555 तर नगर येथून कांदा भरून चेन्नईला चाललेला मालट्रक क्र. टीएस 05 यूसी 2549 यांची शिऊर फाट्यावर समोरासमोर जोरात धडक झाली, यामध्ये हैद्राबाद येथील रहिवाशी के. मोहन रेड्डी वय (65) व लग्झरी ड्रायवर राजेश आर रिंगोजी, रा. गौतमनगर (वय 45) या दोघांचा जागीच मृत्यु झाला, तर
टि.वी. राव वय( 50), विनोद कुमार विजयवाड़ा (30), नारायन यन्नु ( 45), पी.अहमद (50), जितेंद्र कुमार ( 38) , मधुसुदन रेड्डी ए. वाय (46), सुनिता पी वाय ( 40), शेख लतीब वय( 35), खलील शेख वय (45) सर्व रा. हैद्राबाद हे नऊ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच, सहाय्यक पो. नि. नितीन पगार आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले, यावेळी शिर्डी येथील प्रविण अल्हाट यांनी जिवाची पर्वा न करता ट्रक मध्ये अडकलेल्या दोन जखमींना तब्बल दोन तास प्रयत्न करत बाहेर काढले. या वेळी पत्रकार मिठुलाल नवलाखा, युवराज जगदाळे, विकास मासाळ, अशिष मासाळ, संजय बहिर, विनोद बहिर, शिवाजी येवले, बाळू येवले, गणेश भळगट, सुमित चानोदिया, गणेश देवकाते, महेश आडाले, सागर साबळेसह अनेक नागरिकांनी मदत केली. 
यावेळी जामखेड, नान्नज, खर्डा तिन्ही ठिकाणच्या 108 अ‍ॅम्ब्युलन्स तातडीने आल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी तातडीने जखमींवर प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी नगरला पाठवले.