Breaking News

गुजरातमधील सहकारी बँकामधून काळा पैसा पांढरा

‘शाह ज्यादा खा गया’! काँगे्रस अध्यक्ष राहूल गांधी यांचा अमित शाह यांच्यावर निशाणा 
नवी दिल्ली : देशात झालेल्या नोटाबंदी दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह अध्यक्ष असलेल्या गुजरातमधील सहकारी बँकामधून तब्बल 750 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शाह यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, शुक्रवारी काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘शाह ज्यादा खा गया’ अशा हॅशटॅगचे एक ट्विट करुन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. 
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी माहिती अधिकारातून प्राप्त माहितीच्या आधारावर सांगितले, की अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. या बँकेत अवघ्या 5 दिवसात 750 कोटी रुपयांचे जुन्या नोटा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून प्राप्त या माहितीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन अमित शाहजी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक, आपल्या या बँकेने सर्वाधिक जुन्या नोटांचे नवीन नोटामध्ये रूपांतर केल्यामुळे पहिले बक्षिस पटकावले, पाच दिवसांत 750 कोटी ! कोट्यावधी भारतीयांचे आयुष्य या नोटबंदीमुळे उद्धवस्त झाले. तुमच्या या कामगिरीला सलाम! असे टीकात्मक ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच या ट्विटमध्ये ’शाह ज्यादा खा गया’ असा हॅशटॅग वापरून शाह यांच्या शहजादा या वक्तव्यांचा समाचार ही घेतलेला दिसून येत आहे.  काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले की, मोदी यांनी नोटबंदीकरुन एक आपत्ती निर्माण केल्याचे 19 महिन्यांनंतर समोर आले आहे. आता नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे. ज्या माध्यमातून आपले काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही नोटबंदी केली असल्याचा आरोपही काँगेसने केला आहे.