जातपडताळणी प्रमाणपत्रची अट शिथिल करा : औताडे
कोरपरगाव शहर प्रतिनिधी :
वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये, म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्रची अट शिथिल करावी, अशी मागणी नितिन औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव तालुका शिवसेनेचे नेते नितिन औताडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लेखी स्वरुपात निवेदन पाठविले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यासह कोपरगाव तालुक्यात मागासप्रवर्गातील अनेक विद्यार्थी नीट, जी, सीईटी, सेट आदी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश मिळावा, यासाठी या सर्वांची सध्या सर्वच ठिकाणी धावपळ सुरू आहे. मात्र प्रवेश घेण्यासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश फार्मसोबत जातपडताळणी केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक करण्यात आलेले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्यासह इतर सर्व कागदपत्रे जातपडताळणी कार्यालयाकडे सादर देखील केलेले आहे. मात्र एकाचवेळी सर्वांची जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेश घेण्याच्या मुदतीत मिळणे शक्य नाही.