Breaking News

सैन्यभरती पेपर फुटी प्रकरणात लष्करातील 3 क्लर्क मास्टरमाईंड

ठाणे, दि. 02 - लष्करी भरती परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. या पेपर फुटीप्रकरणात लष्करात काम करणारे तीन क्लर्क मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघे नागपुरातून हा गोरखधंदा करत होते. त्यात त्यांना लष्करातील काही जवान आणि निवृत्त अधिकार्‍यांची मदत होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. लवकरच या तिघांना अटक करण्यात येईल.
रवींद्र कुमार, धर्म सिंह, निर्गम कुमार पांडे हे तिघेही खाजगी क्लासेसला मदत करायचे. रवींद्र कुमार काही दिवसांपूर्वी परीक्षेला आलेल्या काही मुलांना भेटला. त्याने मुलांना मदत करण्याचं आश्‍वासन दिलं आणि मुलांनी ही माहिती सातारा जिल्ह्यातील फलटणमधील छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी अ‍ॅकॅडमी चालवणार्‍या आप्पा जाधव आणि संतोष शिंदे यांना दिली. इथूनच या गोरखधंद्याची सुरुवात झाली.
दिल्लीत पेपर तयार झाल्यानंतर ते सीडीने विविध केंद्रांवर पाठवले जात होते. हे तिन्हीही क्लर्क पेपरची सीडी आपल्या कंप्युटरमध्ये टाकल्यानंतर ती परीक्षेच्या एक दिवस अगोदर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलांना पाठवत होते.  त्यामुळे ठाणे पोलिसांनी आता या पेपरने पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही शोध घेणं सुरु केलं आहे. शिवाय यातून झालेल्या कमाईचाही आढावा घेतला जात आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही सर्व माहिती लष्कराला दिली असून तिन क्लर्कला लवकरच अटक केली जाणार आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचीही माहिती आहे.