Breaking News

सोमदेव देववर्मनचा टेनिसला अलविदा

नवी दिल्ली, दि. 01 - भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने सततच्या दुखापतींमुळे व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 31 वर्षीय सोमदेवने आपला निवृत्तीचा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला. 2017 या नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवं पाऊल उचलत असल्याचं सोमदेवनं म्हटलंय. 2012 साली सोमदेवच्या खांद्याच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यातून सावरून सोमदेवने पुनरागमन केलं पण गेला बराच काळ तो स्पर्धात्मक टेनिसपासून दूर होता.
सोमदेव देववर्मनने गेल्या आठ वर्षांत 14 डेव्हिस चषक लढतींमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. 2010 साली भारताला डेव्हिस चषकाच्या वर्ल्ड ग्रुप प्लेऑफमध्ये  स्थान मिळवून देण्यात सोमदेवचा महत्त्वाचा वाटा होता.
2010 साली चीनच्या ग्वांगझूमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमदेवने पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीत सुवर्णपदकं मिळवली होती. सोमदेवने 2009 साली  चेन्नई ओपनचं आणि 2011 साली साऊथ आफ्रिका ओपनचं विजेतेपद मिळवलं होतं. त्याआधी अमेरिकेतील राष्ट्रीय कॉलेज टेनिसमध्ये सोमदेवने विक्रमी 44  विजयांची नोंद केली होती. सोमदेवला 2011 साली अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.