Breaking News

‘गौतम’ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड


कोपरगाव ता. प्रतिनिधी

तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये दि. १ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात ६७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली. 

ते म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. याहीवर्षी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातून इंजिनिअरिंग डिप्लोमा बरोबरच आर्ट, कॉमर्स व सायन्स पदवीधारक तसेच एम. सी. व्ही. सी. व आय. टी. आय.धारक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये धूत ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड, आर. जी. सानप कन्स्ट्रक्शन, भारत फोर्ज, देवगिरी फोर्जिंग प्रा. लिमिटेड, कल्याणी फोर्ज, मिंडा ग्रुप आदी नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पात्रताधारक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये एकूण १२९ विद्यार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या. 

दरम्यान, निवड करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, माजी आ. अशोक काळे, विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव चैताली काळे, प्राचार्य सुभाष भारती आदींसह सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी यांनी अभिनंदन केले.