Breaking News

वळवाच्या पहिल्याच पावसाचा दुकानदारांना फटका! ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न भंगले : तनपुरे

राहुरी विशेष प्रतिनिधी

शहरात काल {१ जून } सकाळी झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्वत्र नाल्या, गटारी तुडूंब भरुन वाहिल्या. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गटारीतील गाळ रस्त्यावर व व्यापारयांच्या दुकानासमोर आला आहे. साचलेला हा गाळ उपसा करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. 

राहुरी नगरपालिकेच्या विरोधी पक्षाचे मार्गदर्शक व राहुरी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा समाचार घेतांना शहरवासियांचे ‘स्मार्टसिटी’चे स्वप्नभंग झाले आहे, अशा शब्दांत लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटावर तोफ डागली. ते म्हणाले, जून महिना सुरु झाला असतांनाही शहरातील मुख्य नाल्या, गटारी साफ झाल्या नाहीत. विरोधी गटाचे नगरसेवक सोन्याबापू जगधने आणि अण्णासाहेब शेटे यांनी पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील नाल्या, गटारीतील गाळ काढण्यासंदर्भात लेखी पत्र दिले होते. मात्र अद्यापही या कामाला सत्ताधारी गटाला वेळ मिळाला नाही. राहुरी नगरपालिकेत सध्या मुख्याधिकारी आठवड्यातून दोन ते तीन दिवस असतात. दालनाचे दरवाजे बंद करुन त्यांचे काम सुरु असते. त्यांच्या दालनात नेमके काय चालते, ते जनतेचे सेवक आहे का इतर कोणाचे, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. नगराध्यक्षांचा हा कारभार त्याच पद्धतीने दालन बंद करुनच सुरु असतो, असा आरोपही चाचा तनपुरे यांनी केला.

चौकट)

गटार, नाली केंव्हा साफ होणार? 

दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेला लेखी पत्र दिले होते. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत केराची टोपली दाखविण्याचा प्रकार करण्यात आला. तसेच शहराचा मुख्य गटार नाला, मलकन ओढा तनपुरेवाडी रोड परिसरातील रात्रीच्या पावसामुळे तुंबलेला आहे. त्यामधे अनेक प्लास्टिक वस्तूंची भर पडलेली आहे. त्यामुळे तो केव्हा साफ होणार, याचे उत्तर प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी द्यावे. 

सोन्याबापू जगधने, अण्णासाहेब शेटे, नगरसेवक. 

चौकट

कलेक्टरांनी चौकशी करावी 

आरोग्यासाठी दर महिन्याला ६ लाख ५० हजार रुपये खर्च होतो. तर वर्षाला एक कोटींचा खर्च केला जातो. फक्त सातजण शहराच्या स्वच्छता विभागात साफसफाई करण्यासाठी आहेत. राहुरी पालिकेतील नगरसेवकांनी वेगवेगळे ठेके घेतले आहेत, याची चौकशी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी करावी.

अतिक बगवान, परिवर्तन आघाडी.