Breaking News

अर्बन बँकेतील गांधीगीरीचे गौडबंगाल,अर्बन बँकेंच्या पारंपारीक प्रतिष्ठेला खासदार कंपूच्या गांधीगिरीचा दंश

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी
शंभरी पार केलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल को-ऑप. बँकेच्या भवितव्याबाबत जाणकार सभासद आणि काही संचालकांमध्ये संशय व्यक्त केला जात असून बँकेच्या भुत आणि भविष्यातील पडझडीला बँकेचे सुत्रेे सांभाळणार्‍या खासदार कंपूच्या गांधीगीरीला जबाबदार धरले जात आहे.--
शंभर वर्षापुर्वी म्हणजे 1910 मध्ये रावबहाद्दूर चितळे यांनी तत्कालीन समविचारी मंडळींना सोबत घेऊन नगर अर्बन को- ऑप बँकेची स्थापना केली. तत्कालीन गोर गरीब दीन दुबळ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा हेतू या बँकेच्या स्थापनेमागे होता. स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या नगर अर्बन बँकेच्या वाटचालीत नवनीतभाई बार्शिकर, झुंबरलाल सारडा, भाऊसाहेब फिरोदिया, मोतीभाऊ फिरोदिया या समाज धुरीणांनी मोलाचे योगदान देऊन बँक प्रगतीपथावर आणून ठेवली. तो समाजकारणाचा वारसा खांद्यावर घेत अलिकडच्या काळात सुवालाल गुंदेचा, अ‍ॅड. अशोक कोठारी यांच्या सारख्या समाजसेवी मंडळींनी बँकेची प्रतिष्ठा जपली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खाते उघडण्यासाठी अर्बन बँकेचे दार ठोठावे लागले. यावरून या बँकेला असलेली कारभाराची परंपरा किती जुनी आहे, हे लक्षात येते.
सन 2008 नंतर मात्र बँकेच्या समाजाभिमूख परंपरेला दृष्ट लागली. अहमदनगर शहराचे भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि त्यांच्या बगलबच्यांनी बँकेच्या कारभाराचा ताबा घेतल्यापासून बँक अधोगतीला जात  असल्याचा आरोप नगरकर करीत आहेत. सन 2008 पासून दिलीप गांधींच्या मार्गदर्शनाखाली बँक स्थापनेच्या हेतूला तिलांजली दिली जात असून घोटाळ्यांची मालिका सुरू झाली आहे.
घोटाळ्यांमागून घोटाळे सुरू असताना बँकेला मल्टीस्टेट शेड्यूल बनविण्याचा अट्टाहास एक प्रकारचे षडयंत्र सुरू असल्याचे दर्शवते, असा आरोप नगरकर उघडपणे करू लागले आहेत.
एकूण शंभर वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या या बँकेला अडचणीत आणण्यास खासदारांची गांधीगिरी कशी कारणीभूत ठरली याविषयी नगरकर वाचत असलेला पाढा लोकमंथनमध्ये क्रमशः प्रसिध्द होत आहे. (क्रमशः)
उद्यापासूनः
अर्बन बँकेला मल्टीस्टेट बनविण्याची धडपड कशासाठी?
शताब्दी वर्षानिमित्त सभासदांची भेट प्रलंबीत का आहे?
संचालकांचा भत्ता वाढवून प्रतिसंचालक प्रतिवर्ष 80 हजाराचा भुर्दंड का?
मुंबईत अद्याप शाखा का उघडली नाही?
मल्टीस्टेट म्हणविता तर महाराष्ट्राबाहेर शाखा का नाहीत? सुरत, बडोदा येथे खोटे पत्ते देऊन सभासद नोंदणी करण्याचा हेतू काय?
खासदार पदाचा दुरूपयोग करून सहकार खात्यावर दबाव आणून घोटाळ्यांची चौकशी का दाबता?
यासारख्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधणारी मालिका... अर्बन बँकेतील गांधीगीरीचे गौडबंगाल!