Breaking News

अग्रलेख आणीबाणीचे भांडवल; अपयशी सरकार !


देशात भाजपचे सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे, या चार वर्षांतील कामकाजाचे मूल्यमापन करण्याऐवजी, आपण या चार वर्षात देशासाठी काय केले ? हे सांगण्याऐवजी मागील सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचण्याच कित्ता सध्याच्या भाजपच्या सरकारने चालविल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय चाणाक्ष आणि धूर्त असून कोणत्याही संधीचे भांडवल करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे आणीबाणीच्या क्षणाला पंतप्रधान मोदी यांनी चांगलेच कॅच करत त्याचे भांडवल सुरू केले. आणीबाणीचा निर्णय इंदिरा गांधीचा चुकीचा निर्णय होता, यात कुणाचेच दुमत नाही. मात्र आणीबाणी ही तत्कालीन परिस्थिती होती. मात्र आज देशातील परिस्थिती देखील आणीबाणीपेक्षा वेगळी नाही. असे अनेक विचारवंताचे, ज्येष्ठ विधीज्ञाचे मत आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भाजपाचेच आमदार-खासदार संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधात, तर कधी आरक्षविरोधी वक्तव्ये करतांना दिसून येत आहे. भाजपचे मंत्री खुलआम वक्तव्ये होत असतांना, भाजपकडून कोणत्याही कारवाईचा बडगा उचलण्यात येतांना दिसून येत नाही. त्यामुळे देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कलावंताकडून पुरस्कार वापसी, विचारवंताकडून होणारा विरोध, यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली आहे. त्याविरोधात विरोधकांकडून संविधान बचाव चा नारा देण्यात आला असून, विविध ठिकाणी रॅली, आंदोलनाद्ारे संविधान बचावाचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकतांना दिसून येत आहे. त्यामुळे आणीबाणी पर्वाचे भाडंवल मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. वास्तविक मोदी सरकार आपल्या कामकाजाचा पाढा सर्वसामान्य जनतेसमोर वाचण्यास कचरत आहे. कारण विकासकामाचा परीघ हा कधीच सर्वसामान्य जनता समोर ठेऊन घेतलेला नाही. मोदी सरकारची ध्येयधोरणे ही नेहमीच उद्योगजगतांना पुरक ठरणारी आहेत. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे विविध प्रकरणे समोर आली आहेत. त्यात बँक घोटाळे सर्वात मोठे प्रकरण आहे. अनेक उद्योजकांना पुरेसे तारण न घेता अमाप कर्ज देण्यात आले आहेत. चार वर्षात सुमारे 70 हजार कोटी रूपयांचा बँक घोटाळा झाल्याचा आरोप काँगे्रसने केला आहे. एकूण 13 बँकांमधील घोटाळे समोर आले असून त्याची रक्कम 70 हजार 14 कोटी रुपये एवढी झाली आहे. फरिदाबाद येथील एसआरएस समुहात षडयंत्र, फसवणूक आणि 6 हजार 978 रुपयांचा घोटाळा झाला. एकूण 17 बँकांची फसवणूक झाली आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये अमित शाह संचालक असलेल्या बँकेत तब्बल 750 कोटी रूपयांच्या वर जुन्या नोटा तेही केवळ चार दिवसांत बदलून देण्यात आल्या आहेत. यावरून मोदी सरकारचा पारदर्शकतेचा बुरखा फाटतो. त्यामुळेच आपल्या सरकारचा फाटलेला बुरखा झाकण्यासाठी विद्यमान सरकारकडून मागील साठ वर्षांतील कामगिरीचा पाढा वाचण्यात येतो. गेल्या सरकारच्या कामगिरीचा आलेख खालावला होता, जनता त्रस्त होती, म्हणून त्यांनी भाजपच्या झोळीत मतदान करत त्यांना सत्तेवर बसवले, ते चांगल्या कामगिरीसाठी. मात्र भाजपाकडून सर्वसामान्यांची आता निराशा झाली आहे. त्यामुळे आणीबाणीचे भांडवल करून, आपल्या अपयशी कारभार जनतेपासून लपवता येणार नाही.