Breaking News

देवसडे आणि अंतरवली येथे धाडसी चोरी


नेवासा : तालुक्यातील देवसडे येथे आज {दि. ९} पहाटे २ वाजेच्या दरम्यान गावातील मुख्य पेठेत सहा ठिकाणी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यात एक रायफल व पल्सर दुचाकीसह लाखोंचा ऐवज चोरीला गेला. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वानपथक (डॉक स्कॉड ) आणि ठसेतज्ञांना (फिंगर प्रिंट) बोलविण्यात आले. घटनास्थळाचे ठसे घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चोऱ्यांचा तात्काळ तपास लावण्यासाठी एलसीबीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. देवसडे येथील कामगार पोलीस पाटील विठ्ठल घोडेचोर यांच्या घरी चोरट्यांनी तीन-साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, नवीन साड्या चोरून नेल्या. बाळासाहेब उगले यांच्या घरातून रायफल व तीन-साडेतीन तोळे सोने चोरत साड्या आणि घरातील कपाटाची उचकाउचक केली. विश्वास उगले, शिवाजी उगले, शहादेव बेबंळे यांच्या घरातूनदेखील नवीन साड्या व रोख रक्कम चोरीला गेली. चोरटयांनी जातांना उपसरपंच अरविंद घोडेचोर यांची पल्सर {क्र. एमएच १७ एपी ९४१७ } ही दुचाकी चोरून नेली. चोरीची फिर्याद उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरु होते. अंतरवली येथील अमोल काकासाहेब वाबळे यांच्या घरी रात्रीच्या वेळी चार-पाच जणाच्या टोळीने घरात घुसून त्यांच्या हातात असलेल्या गजाने डोक्यात वाबळे यांना मारहाण केली. घरातील वस्तू बळजबरीने उचकत आई सुनंदा व बायको शीतल यांच्या गळ्यातील पोथी, कानातील कुडके, कर्णफुले, अंदाजे दोन तोळे, खिशातील रोख रक्कम ३० ते ४० हजार रुपये असा असा एकूण ७० ते ७५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.