Breaking News

वाईच्या लाचखोर नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे जाळ्यात

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : ठेकेदाराने केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी त्याच्याकडून 14 हजार रूपयांची लाच स्वीकारताना वाईच्या भाजपच्या नगराध्यक्षा डॉ.  प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्यांच्याविरूध्द वाई पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाईत भाजपची नाचक्की झाली असून वाईसह सातारा जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
संबंधित ठेकेदाराने वाईतील सि. स. नं. 2065 अ मध्ये शौचालयाचे बांधकाम केले असून या कामाच्या बिलातील 1 लाख 40 हजार रूपयांचे बील काढण्याच्या  मोबदल्यात तसेच याच कामाचे उर्वरित बील काढण्यासाठी 14 हजार रूपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली  होती. त्या अनुषंगाने आज (दि. 9) केलेल्या पडताळणीत नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे (वय 42) व त्यांचे पती सुधीर शिंदे (वय 47, रा. 1787, रविवार पेठ, वाई)  यांनी 14 हजार रूपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम सापळा कारवाईच्या वेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या रविवार पेठेतील श्री क्लिनिक येथे  स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले. शिंदे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत केवळ एका मताने निवडून आल्या आहेत. त्यांचे पती वाई येथील द्रविड  हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघांनाही अटक केल्यानंतर वाई पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी रितसर तक्रार नोंदवल्यानंतर सातारा  लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी त्यांना सातार्‍यात आणले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक पोलीस फौजदार  कुलकर्णी, पोलीस हवालदार बनसोडे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल अजित कर्णे, प्रशांत ताटे, विनोद राजे, विशाल जगताप, संभाजी काटकर,  मधुमती कुंभार, निलिमा जमदाडे यांनी केली.