जळगावमधील अल्पवयीन मुलांची नग्न धिंड; ठाण्यात भारिपची निदर्शने
ठाणे - जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावात विहिरीत पोहल्यामुळे मातंग समाजाच्या तीन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
वाकडी गावात मारहाण झालेली तिन्ही मुले ही मातंग समाजाची असून अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना जबरी मारहाणीचा गुन्हा आणि एट्रॉसिटी ऍक्टनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून क ठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जाती-जमातींवर होणार्या अत्याचारांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. हे अत्याचार रोखण्यात सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. जातीय अत्याचार हा सामाजिक प्रश्न आहे. जातीय अत्याचाराचा मुद्दा सामाजिक दृष्ट्या सरकारने सोडविला पाहिजे. त्यासाठी जातीयवादी प्रवृत्तींना जरब बसेल, अशी शिक्षा होण्याची गरज आहे. याचा विचार करुन, संबधित आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच, जातीभेद निर्मूलनासाठी सामाजिक प्रबोधन कार्यक्रम राबवावेत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
दरम्यान, जर, अशाच पद्धतीने अत्याचार होऊ लागले तर अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना या सरकारविरोधात बंड पुकारावे लागेल. जर, हा समाज मोठया संख्येने रस्त्यावर उतरला तर त्यांचा उद्रेक रोखणे सरकारला जड जाईल, असा इशारा यावेळी भारिपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिला.