Breaking News

जामखेड पुन्हा हादरले, तेरकरवर गोळीबार !

नगर शहरातील केडगाव येथील दोन शिवसैनिक, त्यापाठोपाठ जामखेड येथील राळेभात बंधू हत्याकांडाची घटना अद्याप नगरकर आणि जामखेडकर विसरले नाहीत. तोच पुन्हा एकदा जामखेड तालुक्यातील आगी येथे रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर, या शेतकर्‍यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 
या जीवघेण्या हल्यातून तेरकर हे सुदैवाने बचावले. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत फिर्यादी रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर (वय 43 रा. आगी ता.जामखेड) यांनी दिलेली फिर्यादीनुसार गुलाब दादासाहेब खरात, प्रशांत दादासाहेब खरात, दादासाहेब, नंदकिशोर खरात आदींसह 7 ते 8 जण (सर्व रा.आगी ता.जामखेड) रवींद्र उर्फ नितीन भागवत तेरकर यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून बाहेर बोलावले. 
परंतु रवींद्र तेरकर हे भीतीपोटी बाहेर न येता घरातच बसून राहिले. वरील आरोपींनी घराच्या खिडकीची काच उघडून पाहिले व तेरकर यांना म्हणाले की तुला जगात जीवंत रहायचे असेल तर, आमच्या विरोधात दिलेली फिर्याद मागे घे, नाहीतर तुला जिवे ठार मारू अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी त्यास आपण जे काही आहे ते, सकाळी पाहू असे म्हणाले असता, वरील आरोपी पैकी एकाने तेरकर यांच्या दिशेने पिस्तूलातून गोळी झाडली. 
यावेळी ते खाली बसल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर गून्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. वरील सर्व आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण व पो.कॉ. गहिनीनाथ यादव हे करत आहेत.