Breaking News

गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई; सुमारे पंधरा लाख रुपयांचा साठा जप्त


मुंबई : बृहन्मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा घालून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला,संगधित तंबाखू सुपारी अशा सुमारे 15 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला.


महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अधिकारी व बृहन्मुंबई विभागातील अधिकारी यांची संयुक्त 18 पथके तयार करुन मुंबई शहरातील विविध भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंबईतील प्रामुख्याने नळबाजार, डोंगरी,धारावी, साकीनाका, चेंबुर, कुर्ला, या संवेदनशील क्षेत्राचा समावेश होता. प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री केल्यामुळे 81 दुकाने सीलबंद करुन 89 व्यक्तींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.

या कारवाईत नळबाजार येथे सुगंधित तंबाखू उत्पादन करणारा एक अवैध कारखानाही सील केला असून या ठिकाणी सुगंधित तंबाखू, सुगंधी द्रव्ये, उत्पादनासाठी लागणारे साहित्य इ. हानिकारक पदार्थ जप्त करुन ताब्यात घेतले आहे. वरील सर्व प्रकरणी अधिक तपास सुरू असून, नियमानुसार पुढील फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. मोहिमेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे विभाग आशुतोष डुंबरे व पोलीस उपआयुक्त पराग मणेरे यांच्या पथकाची मदत घेण्यात आली होती.

ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त, शै. प्र. आढाव यांच्यामार्फत राबविण्यात आली. अशा प्रकारच्या मोहिमा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविणार असल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले आहे.