Breaking News

मच्छिमारांच्या जीवित तसेच मालमत्तेच्या रक्षणासाठी भारतीय तटरक्षक दलाची भूमिका महत्त्वाची - महादेव जानकर


मुंबई: मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात सुरक्षेसाठी घ्यावयाच्या दक्षतेचा संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या मुंबई-गोवा-मुंबई मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. समुद्रतटीय जिल्ह्यांमधील युवक-युवतींनी तटरक्षक दलाच्या भरती प्रक्रियेची माहिती देण्यासह प्रोत्साहित करण्याचे कामही या रॅलीदरम्यान होणार आहे.


भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड्स) वरळी येथील मुख्यालयातून 25 मोटारसायकस्वारांसह 15 मोटारसायकलच्या रॅलीचा प्रारंभ आज झाला. या रॅलीच्या आयोजनामध्ये कोस्ट गार्डसह राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, सीमा सुरक्षा दल, ओएनजीसी आदींनी सहभाग घेतला आहे. रॅलीच्या शुभारंभप्रसंगी कोस्ट गार्डस् कमांडर (पश्चिम विभाग) महानिरीक्षक विजय चाफेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, मँग्रुव्हज सेलचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.वासुदेवन, सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त ओ. पी. पांडे, ओएनजीसीचे समूह महाव्यवस्थापक आर. के. शर्मा आदी उपस्थित होते.


कोस्ट गार्डस् आणि मच्छिमार यांच्यात परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण व्हावेत या हेतूने रॅलीचे आयोजन केल्याबद्दल श्री. जानकर यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, कोस्ट गार्डस्, सागरी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग,गुप्तवार्ता विभाग यांचे अतूट नाते आहे. या तिन्ही विभागांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास समुद्रातील हालचालींची माहिती त्वरित मिळू शकते. त्यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्यापासून वाचता येऊ शकते. तसेच खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या जीविताला तसेच मालमत्तेला वादळ, खराब हवामान आदी नैसर्गिक आपत्ती वा अन्य कारणांनी धोका उत्पन्न झाल्यास कोस्ट गार्ड्स त्वरित मदतीसाठी धावून येते.कोस्ट गार्डसने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये मत्स्यव्यवसाय विभाग सक्रिय सहभाग घेईल तसेच पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन श्री. जानकर यांनी दिले.