महिलेच्या पाकिटातून दागिने लंपास
।संगमनेर/प्रतिनिधी।
शहरातील बसस्थानक सध्या जणू चोरट्यांचा अड्डाच बनले आहे. गेल्या दोन दिवसांतील घटना पाहता हे बसस्थानक चोरट्यांचा ‘फेवरिट डेस्टिनेशन’ ठरले आहे. या बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन सोमवारी {दि. २५ } दुपारी दोनच्या सुमारास एका महिलेच्या पाकिटातून ७५ हजार ६०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी विजया मछिंद्र कोमेकर ( रा. चिंचवाडी, साकुर ता. संगमनेर) या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, मंगळवारी {दि. २६ } पहाटेच्या सुमारास बसस्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. सुनैना नरेश गुर्जर ( रा. भदयाना जि. ढोलपूर, राजस्थान) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दिगंबर ज्ञानोबा बडे (रा. येळी ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास हे. कॉ. गोरे हे करीत आहेत.