Breaking News

खंडणीप्रकरणी दाऊद गँगचा हस्तक जेरबंद; मुंबई गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या


।संगमनेर / प्रतिनिधी।
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला दाऊदच्या हस्तकाला अटक करण्यात यश आले आहे. रामदास रहाणे असे त्याचे नाव आहे. खंडणीविरोधी पथक त्याच्या मागावर होते. त्याला पोलिसांनी संगमनेर येथून अटक केली. 

मुंबईतील एका व्यवसायिकावर हल्ला करण्याची सुपारी रामदासला देण्यात आली होती. मात्र वेळीच त्याची कुणकुण मुंबई गुन्हे शाखेला लागली. गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी रामदासकडून एक पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केली आहेत. 

मुंबईतील एका व्यावसायिकाने दुबईत हॉटेलचा व्यवसाय सुरु केला होता. या ह़ॉटेलमध्ये रामदास याच्या मित्राने सुमारे पाच लाख (दिरामची) गुंतवणूक केली होती. २००१ साली दाऊदच्या इशाऱ्यावरून या गुतवणूकदाराची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मुंबईतील या व्यावसायिकाकडून पाच लाख रुपये दिराम दाऊद गँगने वसूल केले होते. काही महिन्यांपासून फिर्यादीला पुन्हा पाकिस्तानातून खंडणीसाठी धमकावले जात होत. या व्यावसायिकाकडून ५० लाखांची खंडणीची मागणी केली जात होती. अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. व्यावसायिकाने पोलिसात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य बघता मुंबई पोलिसांनी फिर्यादीला संरक्षणसुद्धा देऊ केले होते. दरम्यान, खंडणीविरोधी पथकाचा समांतर तपास सुरू होता. या तपासाला यश आले असून दाऊदचा हस्तक असलेल्या रामदास रहाणेच्या मुसक्या आवळल्या.

अनेकजण होते रामदासच्या रडारवर 

मुंबईतील व्यावसायिक ढोलकिया यांच्या कार्यालयावर २०११ साली गोळीबार झाला होता. रामदास रहाणे हा त्यातील प्रमुख आरोपी आहे. रामदास रहाणेवर मुंबई आणि गुजरातमध्ये मिळून ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अनेकजण रामदास रहाणेच्या रडारवरदेखील होते.