Breaking News

शेतकर्‍यांनी एसआरटी तंत्रज्ञानाने भात लागवड करावी : घोरपडे

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात एसआरटी तंत्रज्ञानाने भात लागवड करुन उत्पादना वाढ करावी, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी केले.
जावळी तालुक्यात तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गंत व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील शेतकर्‍यांना सगुणा भात तंत्रज्ञानाने भात लागवड करण्याचे प्रशिक्षण आयोजि
त करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प उपसंचालक विकास बंडगर, जावळी कृषि अधिकारी आप्पा पाटील, मंडळ कृषि अधिकारी शेखर गुजर, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक संग्राम घाडगे उपस्थित होते.
घोरपडे यांनी मार्गदर्शन करताना सगुणा तंत्रज्ञान पध्दतीमध्ये चिखलणीची गरज नसते त्यामुळे मशागतीच्या खर्चाची बचत होते, रोपांच्या पुर्नलागवडीची गरज नसते तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो व येणारे उत्पादन जास्त येते तसेच एकदा केलेले गादी वाफे अनेक वर्षे वापरता येतात व पाण्याची उपलब्धता असेल तर वर्षातून तीन पिके घेता येतात, असे सांगून जावळी तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी सगुणा भात तंत्रज्ञानाचा लाभ घेणेबाबत व हा प्रकल्प राबविणेबाबत आवाहन करुन उत्पादन वाढीची माहिती दिली.
या प्रशिक्षणामध्ये कर्जत येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान म्हणजे भाताची लागवड एसआरटी पध्दतीने करणे व त्यापासून होणारे फायदे याची ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली. कृषि विज्ञान केंद्र, बोरगावचे शास्त्रज्ञ संग्राम पाटील यांनी सगुणा भात तंत्रज्ञानाने भात लागवड याविषयी संपुर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले तसेच कृषि विज्ञान केंद्र, कालवडेचे शास्त्रज्ञ ए. जी. गणपुले यांनी भातावर येणारे किड व रोग व भाताचे पाणी व्यवस्थापन इ. बाबत मार्गदर्शन करून भात उत्पादनात वाढीबाबत माहिती दिली. यावेळी जावळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.