Breaking News

दखल - भाजपवर मित्रपक्षाचा दबाव

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला जनतेनं धडा शिकविला. कर्नाटक हाती येता येता राहिले. वेगवेगळ्या माध्यमांनी केलेल्या पाहणीत भाजपला पूर्वीइतक्या जागा मिळणार नाहीत, असं स्पष्ट झालं. भाजपलाही याची जाणीव झाली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांत पूर्वीइतक्या जागा मिळणार नसतील, तर होणारं नुकसान कसं भरून क ाढायचं, हा भाजपपुढचा प्रश्‍न आहे. बेरोजगारी आणि नाराज शेतकरी अशा दोन समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यातच मोदी यांच्या पक्षाला पराभूत करता येतं, असा विश्‍वास तमाम विरोधकांना आल्यामुळं त्यांनीही मतभेदाला तिलांजली देत एकत्र यायला सुरुवात केली आहे.

अशा वेळी भाजपनं आता संपर्क अभियानाच्या माध्यमातून मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी मित्रपक्षांना अजिबात किंमत न देणार्‍या भाजपला आता मित्रपक्षांपुढं गुडघे टेकविण्याची वेळ आली आहे. तेलुगु देसम बाहेर गेला, तरी तिथं वायएसआर काँग्रेसचा तरी पर्याय भाजपकडं आहे; परंतु महाराष्ट्र व पंजाबमध्ये तसा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचीही छुपी मदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळं भाजपला शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढण्याची वेळ आली आहे. अपमानाचे आवंढे गिळीत मित्रपक्षांच्या कलाकलानं घेण्याची भाजपची व्यूहनीती आहे. लांबची शर्यत जिंकायची असेल, तर काही पावलं मागं जावं लागतं हे खेळातलं सूत्र आता भाजप राजकारणात ही राबवू इच्छित आहे. भाजपवर कोणत्याही मित्रपक्षानं जेवढी टीका के ली नसेल, तेवढी टीका शिवसेनेनं केली असली, तरी हा अपमान गिळून शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी मुंबईत केला. शाह यांच्या मुंबई भेटीत उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील आता हाती यायला लागला आहे. पूर्वीप्रमाणंच लोकसभेच्या निवडणुकीत भाजप हा मोठा भाऊ तर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना हा मोठा भाऊ असा फाँर्म्युला शाह यांच्यापुढं ठेवल्याचं वृत्त आहे. लोकसभा जिंकण्यासाठी भाजप हा प्रस्ताव मान्य करील का, लोकसभेत एकदा यश मिळाल्यानंतर राज्यात छोट्या भावाची भूमिका भाजप स्वीकारेल का, या दोन प्रश्‍नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत अशा चर्चाना अर्थ नाही. अर्थात लोकसभेच्या निवडणुकीला अजून दहा महिने वेळ आहे. एकाच बैठकीत लगेच तोडगा निघेल, असंही नसतं. एाह-उद्धव ठाकरे भेटीत शिवसेना नेतृत्वानं शाह यांच्यासमोर जागावाटपासाठीचा प्रस्ताव मांडला. यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या भावाचा मान देण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवली. भाजप-शिवसेना युती कायम राहावी, यासाठी शाह यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली असतानाच शिवसेनेनं या बैठकीत भाजपला जागावाटपासाठीचा फॉर्म्युला सांगितल्याचं समजतं शिवसेनेने विधानसभेतील 288 पैकी 152 जागा आणि मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडं द्यावे, असा प्रस्ताव दिल्याचं समजते. शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजप तयार होईल का, हा प्रश्‍नच आहे. या प्रस्तावावर शाह यांनी ठोस आश्‍वासन देणं टाळलं. याबाबत पुढील बैठकीत चर्चा करू असं सांगत शाह तिथून निघून गेले.
भाजपला 2014 मध्ये जेवढ्या जागा दिल्या तेवढ्याच जागा आगामी लोकसभा निवडणुकीत देण्याची शिवसेना नेतृत्वाची तयारी आहे. लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढवण्यास पक्षनेतृत्व तयार आहे; पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला जास्त जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी पक्षनेतृत्वाची भूमिका आहे. शिवसेनेच्या विधानसभेत 62 जागा निवडून आल्या, तर भाजपच्या 122. दुप्पट जागा मिळविलेला भाजप जागा वाटपात 130 जागांवर समाधान मानण्याची शक्यता नाही. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत दिल्लीत पुन्हा भाजपची सत्ता आली, तर राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूनं झुकतील आणि याचा फटका शिवसेनेला बसेल, अशी भीती शिवसेनेतील एका गटाला वाटते. भाजप शिवसेनेला 130 पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी शक्यता आहे. शाह यांनी राज्यातील नेत्यांना शिवसेनेसोबत युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्यास तयार रााहा, अशा सूचना दिल्याचे समजते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 26 जागा भाजपनं तर 22 जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या. पण ऑक्टोबर 2014 मधील विधानसभा निवडणुकीत युती तुटली. शिवसेनेनं 282 जागा लढवल्या. पण त्यांना फक्त 62 जागांवरच विजय मिळवता आला. तर भाजपनं 260 जागा लढवून त्यापैकी 122 जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) शिवसेना, शिरोमणी अकाली दल व अन्य पक्ष भाजावर नाराज असतानाच ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेतृत्वानं पुढाकार घेतला आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप नेत्यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार असून हाच पॅटर्न यापूर्वी राज्यात शिवसेनेसोबत राबवण्यात आला होता. आता ही संयुक्त समिती एनडीएला तंटामुक्त करेल का, याची उत्सुकता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली. यानंतर आत्मविश्‍वास वाढल्यानं भाजप नेतृत्वानं एनडीएतील मित्रपक्षांकडं काहीसं दुर्लक्ष केल्याची भावना शिवसेना, अकाली दल व अन्य पक्षांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं असून आता शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्येही अकाली दल भाजपवर नाराज आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी शाह यांनी मुंबईत मातोश्रीवर जावून ठाकरेंची भेट घेतली, तर दुसर्‍या दिवशी पंजाबमध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल आणि सुखबीर सिंग बादल यांची भेट घेतली.
पंजाबमध्ये भाजपनं अकाली दलासोबत संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये दोन्ही पक्षांमधील प्रत्येकी तीन नेत्यांचा समावेश असेल. जागावाटप तसंच अन्य मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचं काम ही समिती करणार आहे. पंजाबमध्ये अकाली दल- भाजपमध्ये जागावाटपावरुन वाद आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 3 जागा तर स्वतःकडं 10 जागा ठेवण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे, तर भाजपनं जागा वाढवून मागितल्या आहेत. या वादांवर संयुक्त समिती तोडगा काढणार आहे. महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत भाजपनं एक समिती आधीच स्थापन केली आहे. शिवसेनेसोबत युती तुटणार नाही, असा दावा भाजप नेते करीत आहेत. बिहारमध्येही रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा आ णि जनता दल संयुक्तचे नितीशकुमार हे मित्रपक्षातील नेते भाजपवर नाराज आहेत.