Breaking News

पीककर्जासाठी केली शरीरसुखाची मागणी, संतापजनक घटना

मलकापूर, दि. 23, जून - पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणार्‍या तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकार्‍यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. त्या अनुषंगाने संबंधित शेतकर्‍याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकार्‍याने अश्‍लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पिककर्जासोबत वेगळा पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठ विला. संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने पोलिस निरिक्षक बी.आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. चौकशी अंती गुरूवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोरी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.