भय्युजी महाराज अनंतात विलीन; अनुयायांची अंत्ययात्रेला अलोट गर्दी
इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज उर्फ उदयसिंह विश्वासराव देशमुख (50) यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर इंदूरच्या मेघदूत मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी यावेळी उपस्थित होते. तसेच दिग्गज मंडळी, अनेक राजकीय नेते यावेळी उपस्थित होते. बुधवारी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत भय्यूजी महाराजांचे पार्थिव त्यांच्या आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर विजयनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून भय्यूजी महाराजांच्या अंतिम प्रवासाला सुरूवात झाली. भय्यूजी महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातून अनेक मान्यवर हजेरी लावण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुष्यातील ताणतणावाला मी पुरता कंटाळलो आहे. त्यामुळे आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही. माझ्या मृत्युसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असे भय्युजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यूजी महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरात भैय्यूजी महाराजांचा दांडगा जनसंपर्क होता. कित्येक राजकीय नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. अन्ना हजारे यांचे दिल्लीतील उपोषण सोडविण्यात भैय्यूजी महाराजांनी महत्वाची भूमिका बजावली होती. धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रासह राजकीय अंगाची चांगली जाण असणार्या भैय्यूजी महाराजांनी अशी अचानक एक्झिट घेतल्याने अनेकांना मोठा
धक्का बसला आहे.
भय्यू महाराजांच्या मुलीचे गंभीर आरोप
भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने सावत्र आईवर आरोप केले आहेत. सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे. तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असं आयुषी यांचे म्हणणे आहे. भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटले होते. त्यानंतर दुसर्या पानावरील उल्लेख समोर आला आहे. यामध्ये त्यांनी आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असे म्हटले आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-काबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.