मला राज्य विकासाच्या फिटनेसची अधिक चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेजला कुमारस्वामींचा टोला
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फीटनेस चॅलेंज दिले. त्यावर कुमारस्वामींनी पंतप्रधान मोदींना उत्तर दिले आहे. योग आणि ट्रेडमिल हे माझ्या दैनंदिन व्यायामाचा एक भाग आहेत परंतु मला माझ्या राज्याच्या विकासाच्या फिटनेसची जास्त काळजी आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. प्रिय नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्या आरोग्याबद्दल चिंता केल्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो आणि तुमचा आभारी आहे. शारीरिक फिटनेस सर्वांसाठी महत्वाचा आहे. योग आणि ट्रेडमिल माझ्या रोजच्या व्यायामाचा भाग आहेत. पण, माझ्या राज्याच्या विकासाच्या फिटनेसबद्दल मी जास्त जागरुक आहे आणि त्यासाठी आपले समर्थन हवे आहे, असे ट्विट कुमारस्वामी यांनी केले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेल्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ मोहिमेत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फीटनेस चॅलेंज पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा हिला फिटनेस चॅलेंज दिले आहे. नरेंद्र मोदींना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने फिटनेस चॅलेंज दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले.