Breaking News

स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन कृषी प्रदर्शनासह तज्ज्ञ करणार मार्गदर्शन


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे उद्यापासून {दि. ६} सुरु होत असलेल्या प. पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गगनभरारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी तज्ञांचे मार्गदर्शन आणि आॅरगॅनिक शेती या विषयावर चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली.

येथील एस. आर. थोरात उद्योग समुहाच्या कार्यालयात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी सदर सप्ताह सोहळ्याविषयी माहिती दिली. यावेळी आबासाहेब थोरात, वसंतराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, किरपाल डंग, संजय महाराज देशमुख, नवनाथ वर्पे, कपिल पवार, प्रशांत वामन, शेखर गाडे, सुहास आहेर, विलास सोनवणे, संदीप वर्पे, कारभारी राहणे आदींसहा सप्ताह कमिटी सदस्य उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मास काळात संगमनेर तालुक्यात गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा पिंपळगाव देपा येथे दि. ६ ते १३ जून दरम्यान हा सप्ताह होणार आहे. यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड नामजप, यज्ञ, काकड आरती, गगनगिरी कीर्तन महोत्सवाबरोबरच शेतकरीबांधवांसाठी गगनभरारी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी {दि. ६} सकाळी आठ वाजता मिरवणुकीनंतर घटस्थापना व कलशपूजन होणार आहे.

यावेळी प. पू. आशिष महाराज, तपस्वी स्वामी गगनानंदजी महाराज, श्रीमंत सरदार चांदजीराव पाटणकर, श्रीमंत सरदार शिवाजीराव पाटणकर, श्रीमंत संजय माने सरकार, श्रीमंत प्यारे मोहनजी वजीर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे.

महंत हरिहरानंदगिरीजी महाराज, प. पू. जंगलीदास महाराज, प. पू. आशिष महाराज, प. पू. कालिदास महाराज, प. पू. विलास महाराज, प. पू. दयानंद महाराज, प. पू. गणेशगिरी महाराज यांच्या दर्शनाचा भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताह काळात दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची तुलसी रामायण कथा होणार आहे. दि. १३ रोजी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्यावतीने करण्यात आले.