Breaking News

ग्रामस्थांची घरे कोणीही खाली करणार नाही : आ. कर्डिले


राहुरी तालुका प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना भेटून नियामक मंडळाकडून पाटबंधारे विभागाला यापुढे अल्पसे भाडे अदा केले जाईल. त्यामुळे येथील रहिवाशांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल. मात्र मुळानगर येथील ग्रामस्थांची घरे कोणीही खाली करणार नाही, अशी ग्वाही आ. शिवाजी कर्डिले यांनी दिली. 

मुळानगर येथील रहीवाशांना पाटबंधारे विभागाने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेवून घरे सोडणार नसल्याचा ठराव संमत केला होता. दरम्यान, आ. कर्डिले यांनी आज {दि. ५} ग्रामस्थ व अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव पंडीत होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे, शाखा अभियंता बुधवंत, आंधळे, उपअभियंता खेडकर, प्रभारी गटविकास अधिकारी माने, कारखान्याचे संचालक नामदेव ढोकणे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रविण लोखंडे, प्रभाकर गाडे, साईनाथ कदम, अंकूश बर्डे, मयूर गवळी, विलास पाटोळे, रमेश निसळ, दिलीप बर्डे आदी उपस्थित होते.

आ. कर्डिले म्हणाले, सन १९६०-६५ सालापासून मुळानगर या ठिकाणी येथील रहिवासी राहत आहेत. मुळा धरणातील मासेमारीच्या ठेक्यावरून पाटबंधारे विभागाने रहिवाशांना लक्ष करत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आपण ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. उजनी धरण या ठिकाणीही असा प्रकार झाला होता. तो प्रश्नही असाच मिटला गेला. मासेमारी करणा-या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक ठेवून मुळा धरणात मासेमारीसाठी वेगवेगळे प्रकार करणारांवर लक्ष ठेवावे. त्यामध्ये दोषी असणारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. मात्र सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये.

प्रारंभी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रास्तविक केले. कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी ग्रामस्थ व प्रशासन यामध्ये समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू. घरे भाडेतत्वावर देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी मुळानगर येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.