Breaking News

राशीनची युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न

कर्जत तालुक्यातील राशिन येथील युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हा प्रयत्न केला. मात्र तिजोरीपर्यंत चोरटे पोहोचू शकले नसल्याने हा प्रयत्न फसला.
राशीन येथे कर्जत-बारामती महामार्गावर युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. चोरट्यांनी बँकेचे शटर व लोखंडी दरवाजा उचकटून बँकेत प्रवेश केला. आत जावुन चोरट्यांनी तिजोरीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला.परंतु तिजोरीपर्यंत ते पोहोचु शकले नाहीत. सकाळी हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती समजताच राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरिक्षक वैभव महांगरे, पोलीस कॉन्सटेबल तुळशीदास सातपुते, गणेश ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी बँकेच्या शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये कापडाने चेहरा गुंडाळलेले दोन चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले.
रविवार असल्याने बँक बंद होती. सोमवारी बँकेची शाखा नियमित कामकाजासाठी उघडण्याआधी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील ठसेतज्ञ ए.एस.भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. मात्र चोरट्यांचा कोणताही माग पोलिसांना सापडला नाही. पुढील तपास राशिन पोलीस करीत आहेत.