Breaking News

राज्य आणि केंद्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!


।संगमनेर/प्रतिनिधी।

राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच राहिले. सातत्याने शेतकरी विरोधी भुमिका घेत, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या, त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शासनाविरोधात आज {दि. ५ } सकाळी आंबी खालसा फाटा येथे सुमारे १५० शेतकऱ्यांनी  निषेधाच्या घोषणा दिल्या. पठार भागातील बागायती भाग असलेल्या आंबी खालसा परिसरातील शेतकरी कांदा, टोमॅटो या सारखी नगदी पिके घेतात. त्याच्या जोडीला दुय्यम व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. मात्र भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण डबघाईला आले आहे. मागील वर्षीचे आंदोलन खोटी आश्वासने देऊन मोडीत काढल्याने, शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतीमालाला किमान हमीभाव, दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री व कृषी व कृषीपूरक क्षेत्रासाठी संपूर्ण कर्जमाफी या मागण्यांसाठी देशातील शेतकरी मैदानात उतरले आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशी आंबीखालसा फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजता सकाळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करीत सरकारचा निषेध केला होता. तर आजच्या पाचव्या दिवशी त्यापुढे जाऊन सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. आंबी खालसा परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी एकत्र जमून, अंत्ययात्रेचे आयोजन केले. या घटनेची खबर मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, उपनिरीक्षक अन्सार इनामदार फौजफाट्यासह हजर झाले. मात्र शेतकऱ्यांनी महामार्गावर न येता ठरल्याप्रमाणे बाजूच्या शेताच्या वाटेने जात, शेतात अंत्यविधी केल्याने कायदा व सुव्यवस्थेला बाधा आली नाही. उपस्थित महिला व पुरुषांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. या वेळी आंबी-खालसाचे सरपंच सुरेश कान्होरे, तान्हाजी मुंढे, पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे, अरुण कान्होरे, बाळासाहेब ढोले, सुरेश गाडेकर, दत्तात्रेय कान्होरे, निवृत्ती कहाणे, नितीन काशीद आदींसह सुमारे २५ ते ३० महिला शेतकरी उपस्थित होत्या.