Breaking News

सीता टेस्ट ट्युब बेबीचे अपत्य उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य

लखनौ - त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी देखील आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आधुनिक शोध पुराणतन काळातच लागल्याचा जावईशोध लावण्यास सुरूवात केली आहे. थेट प्रक्षेपण करण्याच्या तंत्रज्ञानाची सुरूवात महाभारत काळातच झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर रामायणातील सीता हे टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञानाचे अपत्य असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

हिंदी पत्रकारिता दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना शर्मा म्हणाले, की थेट प्रक्षेपणाचे तंत्र महाभारत काळात देखील अस्तित्वात होते. त्याचा उपयोग करूनच कुरूक्षेत्रावर सुरू असलेले युद्ध धृतराष्ट्रांना हस्तीनापूरमध्ये बसून पाहता आले. आज थेट प्रक्षेपण केले जात असले, तरी मला वाटते असेच तंत्रज्ञान महाभारत काळात अस्तित्वात होते. जेव्हा संजय हस्तीनापूरमध्ये होता तेव्हा तो थेट प्रक्षेपणाच्या आधारे धृतराष्ट्रांना महाभारताचे युद्ध दाखवत होता. शर्मा यांनी बीजांड व शुक्रजंतूच्या आधारे गर्भधारणा (आयव्हिएफ) असेल किंवा टेस्ट ट्युब बेबी असेल याचेही तंत्रज्ञान रामायण काळात अस्तित्वात असल्याचे म्हटले. यासाठी त्यांनी सीतेचा जन्म त्याआधारेच झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, लोक म्हणतात की सीताजींचा जन्म जमीनीतील एका भांड्यात झाला. याचाच अर्थ रामायणकाळी असे तंत्रज्ञान अस्तित्वात होते. दरम्यान त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब  यांनी इंटरनेट व उपग्रहांचा शोध महाभारत काळातच लागल्याचा जावईशोध लावला होता. यावेळी देब यांनी संकुचित लोकांनाच यावर विश्‍वास ठेवण्यास कठीण वाटेल, असेही तारे तोडले होते.