Breaking News

देशभरातील शेतकरी संपावर देशभरातील 22 राज्यांमध्ये शेतकर्‍यांचे आंदोलन

 मुंबई - संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि किमान उत्पन्न हमी योजना अशा विविध मागण्यांसाठी देशासह राज्यातील बळीराजा शुक्रवारपासून 10 दिवसांसाठी संपावर गेला आहे. या कालावधीत दुधासह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जाणार नाही. भारतीय किसान संघाचे अध्यक्ष बलबीर सिंग राजवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतातले शेतकरी 1 जून ते 10 जून या कालावधीत भाज्या, फळे, दूध आणि अन्य पिकांचा पुरवठा करणार नाहीत. देशभरातील 100 हून अधिक शेतकरी संघटना संपात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपासूनच शेतमाल मुंबई, पुणे या शहरांकडे पाठवणे बंद करण्यात आले आहे. बाजारपेठेत उत्पादनांचा पुरवठा करण्यास नकार शेतकरी आपल्याच गावात उत्पादने विकणार आहेत व गरज असल्यास मोफत देण्यासही तयार आहेत. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बाजार समित्यांमध्ये प्रवेश करणार नसल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. संपाच्या कालावधीत शेतकर्‍यांनी भाजीपाला किंवा दूध रस्त्यावर फेकण्याऐवजी ग्रामीण भागातील गरजूंना द्यावा, असे आवाहन किसान क्रांती जन आंदोलन या शेतकरी संघटनेने केले आहे.

सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे, अशी माहिती जनआंदोलनाचे अ‍ॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील 22 राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना आजपासून भाजीपाला, दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.