Breaking News

कृषी क्षेत्रात संशोधनाला मोठा वाव : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी - अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने गुणवत्ता जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात वाव देतांना संशोधनावर भर दिला आहे. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी चांगल्या पदावर काम करत आहे. खरे तर राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे ही संशोधनाची केंद्र ठरली पाहिजे. अमृतवाहिनीतील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीवरच भर द्यायला हवा. याचे कारण कृषी क्षेत्राच्या संशोधनात विद्यार्थ्यांना मोठा वाव आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. 

गुणवत्तेची वैशिष्ट्ये जपणार्‍या येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांसाठी अगदी कमी खर्चात कांदा काढणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रास राहुरी कृषी विद्यापीठात जॉन डिअर, किर्लोस्कर, अ‍ॅाटोमोटिव्ह इंजिनिर्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राष्ट्रीय कृषीविषयक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असून दोन लाखांचे बक्षिस मिळाले आहे. या यंत्राची पाहणी करताना आ. थोरात बोलत होते.

यावेळी संस्थेचे विश्‍वस्त लक्ष्मणराव कुटे, शरयू देशमुख, उपसभापती नवनाथ आरगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य केशवराव जाधव, डॉ. चव्हाण, प्राचार्य शिरभाते, विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे, उपप्राचार्य अशोक मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, श्रीमती जे. बी. शेठ्ठी आदी उपस्थित होते. दरम्यान, या यंत्राच्या उत्कृष्ट रचनेसाठी २५ हजार, उत्कृष्ट निर्मितीसाठी २५ हजार आणि उत्पादकतेसाठी २५ हजार असे एकूण २ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे मिळाली. या यंत्राच्या निर्मितीसाठी विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे, प्रा. बी. के. वर्पे, महेश हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कानडेसह २५ विद्यार्थ्यांनी परिश्रम केले.

प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. डॉ. व्ही. डी. वाकचौरे यांनी आभार मानले.