Breaking News

मालवणात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्गनगरी, दि. 10, जून - रात्रभर कोसळणार्‍या पावसामुळे मालवण शहर आणि परिसर जलमय झाला. शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वस्तीत घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आडवण भागातल्य नागरिकांनी तर जागता पहारा ठेवत रात्र जागविली. शनिवारी सकाळपर्यंत मालवण मध्ये 491 मिलीमीटर पाऊस पडला.

शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले ते धडाक्यातच. मात्र मालवणात हा धडाका रात्रभर कायम राहिला आणि सर्व मालवण जलमय होऊन गेले. शहरातील सखल भागात झपाट्याने पाण्याची पातळी वाढली. पहाटेच्या वेळी येथील आडवण भागात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. पुराचे पाण्याने येथील घरांना वेढा घातला. या भागातील वीज पुरवठा बंद झाल्यामुळे त्या मिट्ट काळोखात येथील रहिवाशांची पाचावर धारण बसली. शहराच्या मुख्य रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी आल्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मार्ग सुध्दा बंद झाले. सुदैवाने घराच्या पायर्‍यांपर्यंत पाणी आल्यामुळे येथील रहिवाशी सुदैवाने वाचले. मागील वर्षी सुद्धा याचप्रकारे ही घरे पुराने वेढली होती. तर यामुळे कसाल-मालवण राज्यमार्गावरील देऊळवडा येथे पाणी साचल्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या निमित्ताने अतिवृष्टीवेळी सतत होणार्‍या या प्रकाराने येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून यावर प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
रात्रभर कोसळणार्‍या पावसाचा फटका ’मोरयाचा धोंडा’ नजीकच्या समुद्रकिनार्‍याला सुद्धा बसला. वायरी व दांडी भागातून वाहत येणारे पावसाचे पाणी येथील विशिष्ट मार्गाने मोरयाचा धोंडा नजीक च्या समुद्रकिनार्‍यावरून समुद्राला मिळते. मात्र यावेळी हा प्रवाह प्रचलीत मार्गाने समुद्राच्या दिशेने सरळ न जाता समुद्र किनार्‍याच्या वरील भागातून किनार्‍याला समांतर दांडी भागाच्या दिशेने सुमारे दोनशे मीटर्स अंतर पुढे वाहत जात समुद्राला मिळाला. नगरसेवक पंकज सादये, आप्पा लुडबे सह महेंद्र पराडकर व सहकार्‍यांनी प्रचलित ठिकाणी चर पाडून पाण्याच्या प्रवाहाची वाट मोकळी केली. येथील पाण्याचा प्रवाह प्रचलीत वाट सोडण्याचे कारण म्हणजे येथील किनारपट्टीच्या वरील भागातील वाळूचा अनधिकृतपणे उपसा करून खाजगी वापरासाठी उपयोगात आणण्यासाठी केला जात असल्यामुळे निर्माण झालेल्या या सखल भागातून हा प्रवाह निर्माण झाल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
सागरी महामार्ग नजीक एका खाजगी मालमत्तेच्या ठिकाणी जाण्यासाठी अनधिकृतपणे नवीन मार्ग बनविण्यात आला आहे. यामुळे येथील प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन आणिबाणीची स्थिती निर्माण होऊन या परिसरातील घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे यापूर्वीच पालिकेच्या निदर्शनास आणून देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर अडथळे निर्माण होऊन रेवतळे भागातील घरांमध्ये पाणी घुसले. येथील नागरिकांनी याची माहीती मिळताच नगरसेवक शिला गिरकर, राजन वराडकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे यांनी त्याठिकाणी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने अडथळा दूर केला.