Breaking News

काश्मीर रोज पेटत असताना राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नाही - सुशीलकुमार शिंदे

नागपूर, दि 04, जून - सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच्या बदलल्यात पाकिस्तानच्या 10 जणांना कंठस्नान घालू, अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांचे आता काय झाले, हे समजले नाही. याउलट आपलेच सैनिक व नागरिक अधिक मृत्यूमुखी पडत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलायला तयार नाही. जम्मू-काश्मीरातील आजची ही अत्यंत वाईट स्थिती पाहून केंद्रातील राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नाही?, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.


ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यूपीएच्या काळात जम्मू व काश्मीरमधील स्थिती बरीचशी नियंत्रणात होती. शस्त्रसंधीच्या काळात एवढा हिंसाचार होत नव्हता. आता शस्त्रसंधीच्या काळातही हिंसाचार वाढला आहे. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या युवकांमधील असंतोष वाढत चालला आहे. दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. नियंत्रण रेषेजवळली लोकांना पलायन करावे लागत आहे. हे जम्मू-काश्मीर व देशासाठी घातक आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून काही प्रयत्न सुरू आहे किंवा नाही, याचीच काही माहिती नाही. ही स्थिती केंद्रातील राज्यकर्त्यांना लाजिरवाणी असल्याचे त्यांनी सांगितले.