Breaking News

महाबीज राज्यातील 22 जिल्ह्यात राबविणार ग्राम बीजोत्पादन

अकोला  - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या खरीप नियोजनातील सहा लाख क्विंटल बियाण्यापैकी 90 टक्के बियाणे राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी सोयाबीन जेएस-335 वाणाचे 1.61 लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महाबीजचे विपणन व्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली. राज्यातील अधिकृत शेतकरी गट व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांचेकडे उत्पादीत सोयाबीन प्रमाणित बियाणे उपलब्ध असल्यास, महामंडळ ते खरेदी करून शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी संबधितांनी महामंडळाच्या नजिकच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजद्वारे करण्यात आले आहे.

असे मिळवा अनुदानीत बियाणे -
ग्राम बिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकर्‍यांना एक एकर क्षेत्र मर्यादेमध्ये अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतीचा सातबारा व आधारकार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती देऊन, नजिकच्या कृषी विभाग किंवा महाबीज कार्यालयातून परमीट प्राप्त करावे लागेल. परमीटवर नमुद लोकवाट्याची रक्कम भरून महाबीज विक्रेत्याकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करावे.
अनुदानीत बियाण्याची किंमत -
सोयाबीन जेएस-335 प्रमाणित बियाणे 30 किलोची बॅग शेतकर्‍यांना 1350 रुपयांना मिळेल. धान बियाणे एमटीयु 1001, एमटीयु 1010, आयआर 64, सुवर्णा या वाणाची 25 किलोची बॅग 687.50 व कर्जत 3 ची 25 किलोची बॅग 400 रुपयाला मिळणार आहे.