महाआघाडी ही समाजमनाची इच्छा; कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे वक्तव्य
मुंबई - देशात महाआघाडी करणे ही केवळ विरोधी पक्षांचीच नाही तर देशातील लोकांची भावना झाली आहे. अनेक पक्ष या महाआघाडीत जोडले जात आहेत, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत व्यक्त केले आहे. गोरेगाव येथील 12 जानेवारी रोजी झालेल्या काँग्रेस बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना माध्यमांशी थेट बोलता आले नाही. यासाठी बुधवारी सकाळी 8.30 वाजता वांद्र्याच्या एमसीए येथे ते खास संवाद साधणार होते, मात्र त्यांचा संवाद हा केवळ 3 ते 4 मिनिटांच्या आतच संपला. यावेळी राहुल गांधी एकाच प्रश्नावर बोलले आणि निघून गेले.
भाजप, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. ज्याप्रकारे मोदी, संघ, आणि भाजप संसदीय लोकशाहीवर आक्रमण करून ती संपवू पाहत आहे, तिचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी देशाला आणि मोदी, संघ, भाजप विरोधातील पक्षांना आणि जनतेला जोडण्याचे काम काँग्रेस करत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सरकार सर्वात श्रीमंत लोकांसाठीच काम करत आहे. गरिबांच्या खिशातून पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून पैसा काढून तो 15-20 श्रीमंतांच्या खिशात घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या एका बॅरेलची किंमत ही 140 रुपये होती, आज तीच किंमत 70 रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेल वरील सर्व पैसा हे मोदी सरकार श्रीमंतांच्या खिशात टाकून केवळ त्यांच्यासाठीच काम करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केले, त्यांचे छोटे उद्योग आणि रोजगार अडचणीत आणले. मुंबईतील कपडा, लेदर आदी अनेक उद्योग अडचणीत आले आणि त्यानंतर गब्बरसिंग टॅक्स लावून मोदी सरकारने मुंबईकरांना पुन्हा अडचणीत टाकले. यामुळे मुंबईतील आणि देशातील लहान उद्योजक, दुकानदार, सर्वसामान्य जनता दुःखी असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.