Breaking News

हॉटेल चालकांच्या चुकीमुळे भक्तांना मनस्ताप


शिर्डी / प्रतिनिधी
साईंच्या शिर्डीत भक्त ज्यावेळी बाहेरून येतो, त्यावेळी राहण्यासाठी संस्थांच्या लॉजव्यतिरिक्त अन्य लॉजमध्ये खोली घेतल्यानंतर काही हॉटेल चालक भक्ताला खोलीची चावी देतात. मात्र दर्शन झाल्यानंतर आपण तात्पुरते राहण्यासाठी कोठे खोली घेतली, याचाच संदर्भ साईभक्तांना लागत नाही. खिशात खोलीची चावी असते. मात्र ती चावी शहरातील कोणत्या हॉटेल, लॉजिंग अथवा गेस्ट हाऊसची आहे, याचा बोध होत नाही. त्यामुळे साईभक्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. 

शिर्डी शहर हे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉजिंग असलेले शहर म्हणून प्रसिद्ध आहे. साईसमाधीच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर विदेशातूनही भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यांची संख्या अडीच ते तीन कोटींच्या घरात आहे. शिर्डीत गल्लीबोळासह उपनगरात हॉटेल मोठ्या प्रमाणावर आहेत. काहीजण भक्ताला त्रास होणार नाही, याची काळजीही घेतात. मात्र लहान-मोठे हॉटेल केवळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी भक्तांना रूम देतात. लहान हॉटेल रुम चालविणारे कमी खर्चात चालविण्याच्या नादात रुमला नंबर न टाकणे, हॉटेलचा बोर्ड दिसेल असा न लावणे, व्हिजिटिंग कार्ड न देणे, कुलपाच्या चावीला हॉटेलच्या नावाचे किचेन न देणे अशा प्रकारामुळे भक्तांना नातेवाईक व कुटुंब प्रमुखाची चुकामुक झाल्यास अशावेळी आपण कोणत्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, हे लक्षात येत नाही. अशावेळी हे भक्त ग्रामस्थांना पत्ता विचारतात. माहित असेल तर ग्रामस्थ सांगतात. मात्र जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत भक्तांना होणारा त्रास केवळ काही लोकांच्या चुकीमुळे भक्तांना त्रास होत आहे.

हॉटेलचालकांना सूचना कराव्यात 

दर्शनानंतर तात्पुरते राहण्यासाठी घेतलेल्या खोलीचा साईभक्त शोध घेत फिरत असतात. अशावेळी ग्रामस्थांनाही याचा खुलासा होत नाही. जर काही भक्तांनी खोलीची खूण सांगितली तरच पत्ता सांगता येतो. अन्यथा साईभक्तांना होणारा मनस्ताप हा त्रासदायक ठरत आहे. हॉटेलचालकांनीही भक्तांना बाहेर पडताना व्हिजिटिंग कार्ड किंवा हॉटेलचे नाव असलेली किचेनची चावी दिल्यास हा मनस्ताप कमी होऊ शकतो. यासाठी हॉटेलचालकांना संस्थान व पोलीस प्रशासनाने सूचना करावी.

सतीश गंगवाल, सामाजिक कार्यकर्ते.